भाजपकडून शिवसेनेला धक्‍का ; सेनेला डावलून वायएसआर काँग्रेसला उपसभापती पदाची ऑफर

Foto
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने वायएसआर काँग्रेसला लोकसभेचे उपसभापती पद देण्याची तयारी दर्शवली असल्याचे समजते. भाजप खासदार आणि प्रवक्ता जेव्हीएल नरसिंह राव यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन यांची भेट घेत भाजपचा हा विचार बोलून दाखवला. वायएसआर काँग्रेसच्या २२ खासदारांपैकी एकाला हे पद देण्याचा भाजपचा विचार आहे. तर महाराष्ट्रातील शिवसेनेने लोकसभा उपसभापतीची मागणी भाजपकडे केली असताना भाजपने शिवसेनेला वार्‍यावर सोडून दिल्याचे दिसते.  

लोकसभेचे उपसभापतीपद स्वीकारायचे किंवा कसे, याबाबच वायएसआर काँग्रेसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. भाजपच्या ऑफरवर विचार करण्यासाठी जगनमोहन यांनी वेळ मागितला असल्याचे सूत्रांनी सांगितले. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस पक्षाला मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. भाजपकडून हे पद स्वीकारल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील याची चाचपणी केल्यानंतर जनगमोहन काय तो निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले. या विषयावर मुख्यमंत्री जगनमोहन आणि नरसिंह राव यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेनंतरच नरसिंह राव यांनी जगनमोहन यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडणुकीनंतर लोकसभेचे पहिले सत्र 17 जून रोजी बोलावण्यात आले असून नव्या खासदारांनी शपथ ग्रहण केल्यानंतर नव्या सभापतींची निवड होणार आहे. जगनमोहन 15 जून रोजी राजधानीत दाखल होत असून ते नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहतील. दरम्यानच्या काळात ते पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. भाजपची ऑफर स्वीकारण्यापूर्वी जगनमोहन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही करणार आहेत. 

शिवसेनेच्या दाव्याचे काय? 
शिवसेनेने लोकसभेच्या उपसभापती पदावर दावा केला होता. लोकसभेचे सभापतीपद अर्थातच भाजपला मिळेल, मात्र एनडीएतील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष शिवसेना हाच असल्याने अर्थातच शिवसेनेला उपसभापतीपद मिळेल असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. ज्या अर्थी भाजपने या पदाची ऑफर वायएसआर काँग्रेसला दिली आहे, त्या अर्थी शिवसेनेने या पदाची मागणी सोडली का, किंवा त्या ऐवजी आणखी काही पदरात पाडून घेतले का, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.